संस्थेचा इतिहास


फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, फोंडाघाट

फोंडाघाट, ता. कणकवली, जिल्हा – सिंधुदुर्ग

ग्रामिण व डोंगराळ तसेच सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या देवराईतून ग्रामदेवता श्री. गांगोमाऊली आपला वरदहस्त सरसावते अशा फोंडाघाट या गावातील काहि ध्येयवेड्या तरूणांनी एकत्र येऊन दि. २८ एप्रिल १९५२ रोजी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून फोंड्यासारख्या ग्रामिण भागात शिक्षणाची समान संधी या शिक्षणाची प्राप्ती होऊन सुध्दा केवल प्रतिकूल परिस्थितीमुळे ग्रामिण व डोंगराळ भागातील तसेच फोंडाघाट पंचक्रोशीतील मुले शिक्षणापासून वंचित राहून उज्ज्वल भविष्यापासून दूर रहत होती. या जाणिवेतून पंचक्रोशितील मुलांना शैक्षणिक सुविधा प्राप्त करून देण्यासाठी २८ एप्रिल १९५२ रोजी स्थापन झालेल्या एज्युकेशन सोसायटीचे तात्कालीन सेक्रेटरी कै. रा. म. तथा बाबासहेब नाडकर्णी यांनी विनामुल्य आपल्या दुकानाच्या माडीवर २२ विद्यार्थ्यांचा इयत्ता ८ वी चा वर्ग सुरू केला.

संस्थेला शासकीय अनुदान मिळण्यासाठी संस्था नोंदणीकृत करणे आवश्यक आहे हे ओळखून १८ मार्च १९५३ च्या सर्वसाधारण सभेत संस्थेची घटना मंजूर करण्यात येऊन संस्था बीपीटी अ‍ॅक्ट १९५० अंतर्गत संस्था नोंदणी करण्यात आली. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता फोंडा पंचक्रोशितील विश्वासू ध्येयवेडे तरूण चंद्रकांत डोर्ले, ज. ग. उर्फ दादासाहेब मोदी, रा.ना.भाऊसाहेब पटेल, दतात्रय पारकर, सिताराम म्हसकर व व. बा. उर्फ आबा सामंत, अण्णा साळवी, दाजी सबनीस, आबा गांधी, डॉ. भास्कर आपटे असे कित्येक ध्येयवादी संस्थेबद्दल आपूलकी असण-या फोंडा ग्रामस्थांनी विचार करून वाढणारी विद्यार्थी संख्या व त्यासाठी आवश्यक असणा-या वर्ग खोल्यांचा विचार करता स्वत:ची इमारत असणे आवश्यक होते. त्यावेळी येथील दानशूर व्यापारी शांताराम नेरूरकर,य.आ. पारकर, डॉ. आनंद पारकर यांनी आपलि स्वत:ची जमिन विनामुल्य दिली. त्याचप्रमाणे सं. सो. पारकर यांनी दिलेली चार हजार रूपयांची देणगी, आणि नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे वि. द. भिसे यांनी प्रयोगशाळा साहित्य व फर्निचर अत्यंत अल्प किमतीत दिल्याने संस्थेच्या प्रार्थमिक गरजा पूर्ण होऊन पुढील शासकिय  मान्यतेस सहाय्यभूत ठरले.

संस्थेला शासकीय अनुदान मिळण्यासाठी संस्था रजिस्टर करणे आवश्यक आहे हे ओळखून १८ मार्च १९५३ च्या सर्व  साधारण सभेत संस्थेची घटना मंजूर करण्यात आली. आणि जुलै १९५४ मध्ये संस्था रजिस्टर करण्यात आली. नूतन इमारतीच्या बांधकामाचा खर्च शाळा व्यवस्थापनाचा खर्च या गोष्टी विचारात घेता त्यावेळी संस्था आर्थिक बिकट अवस्थेत होती.

त्यासाठी संस्थेचे पदाधिकारी संचालक हितचिंतक व व्यापारी यांनी कोल्हापूर, बेळगाव,निपाणी, संकेश्वर या ठिकाणी फिरून सुमारे ६५००/- रू. निधी गोळा केला. यामध्ये शंकरराव ग. चव्हाण यांनी दिलेल्या २५००/- रू. उल्लेख महत्त्वाचा ठरतो. संस्थेकडे कायमस्वरूपी फंडासाठी फोंडाघाट बाजारपेठेतील विक्री होणा-या पान – करंड व गुळ ढेपा यावर मात्र १ पैसा स्कूल फंड म्हणून जमा करून सर्व व्यापारी बंधूनी सहकार्य केले. तसेच पंचक्रोशितील सर्व पालक शेतक-यांनी शाळा विकस निधीसाठी भात जमा करून आर्थिक सहकार्यात आपले योगदान दिले.

वर उल्लेख केल्याप्रमाणे १ मे १९५३ रोजी अण्णा साळवी यांचे हस्ते संस्थेच्या शालेय इमारतीची कोनशिला बसवून ३ वर्ग खोल्यांचे बांधकाम सुरू केल्यानंतर संस्थेने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर १९५६ साली दोन खोल्यांचा प्रशस्त हॉल, १९६२ साली आणखी दोन खोल्या, १९६४ साली उत्तरेकडील चार खोल्या, १९६७ साली खुले रंगमंदिर, १९७० साली पुर्वेकडील ६ वर्ग खोल्या इमारत, १९७६ साली स्वतंत्र जिमखाना हॉल बांधण्यात आला. त्याचप्रमाणे उत्तरेकडील इमारतीला जोडून केंद्रशासन पुरस्कृत फंडातून ५ वर्ग खोल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी बांधण्यात आल्या. यासाठी प्रशालेचा माजी विद्यार्थी संघ शाखा मुंबई संस्थेच्या विविध उपक्रमामध्ये नित्य सहभागी होत असतो. त्यांच्या प्रयत्नातून उभारलेला गुरूदक्षिणा सभागृह आज दिमाखात उभा आहे आणि गुरूदक्षिणेचा संस्कार नव्या पिढीला रूजवत आहे.यालाच जोडून ४ वर्ग खोल्यांची दुमजली इमारत बांधण्यात आली आहे. तसेच उच्च शिक्षणाची सुविधा प्राप्त करण्यासाठी महाविद्यालयीन इमारत उभी करण्यात आली आहे. आज सुमारे ३२ वर्ग खोल्यांसह कार्यालय, शिक्षक कक्ष, प्रयोगशाळा, ग्रंथालय, जिमखाना,रंगमंदिर, सांस्कृतिक हॉल, संगणक कक्ष अशा सर्व सुविधांसह शाळा नविन आवाहनाला  सामोरी जाण्यास सज्ज आहे.

२२ विद्यर्थ्यांच्या समवेत सुरू झालेल्या न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट मध्ये प्रारंभी इत्यादी ८ वी ते ११ वी अशा चार तुकड्या होत्या त्यानंतर १९७३ पासून इ. ५ वी ते ७ वी चे वर्ग जोडण्यात आले. आज ५ वी ते १० वी पर्यंतच्या १७ तुकड्या आहेत. त्यानंतर पंचक्रोशितील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पायपिट करावी लागू नये म्हणून १९७५ – ७६ मध्ये नविन अभ्यासक्रमानुसार ११ वी कला वर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर १९८० साली ११ वी वाणिज्य वर्ग जोडण्यात आला.पंचक्रोशितील विद्यार्थ्याना व्यावसायिक शिक्षणाची सुविधा प्राप्त करून देण्यासाठी १९८८ – १९८९ मध्ये अनुदानित ततत्त्वावर ११ वी व पुढील वर्षी १२ वी चे वर्ग सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे पंचक्रोशितील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सुविधा प्राप्त करून देण्यासाठी १९९५ – १९९६ मध्ये कला व वाणिज्य महाविद्यालय वर्ग सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे संस्थने इंग्लिश मिडीयम वर्ग सुरू केला असून मुलांकरता ने – आण करण्यासाठी स्कूल बस खरेदी केली आहे.

आज संस्थेच्या माध्यमिक,उच्च माध्यमिक व महाविद्यालयामधून सुमारे १६७५ विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. ग्रामिण भागात संस्थेने स्थापन केलेल्या प्रशालेमुळे व त्यानंतर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयामुळे अनेकांना सोन्याचे दिवस पाहता आले. प्रशालेने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातिल एक नामवंत हायस्कूल म्हणून नावलौकिक मिळविला आहे.

शालेय परिक्षामध्ये विश्वास नेसरीकर, लॉरेन्स डिसोझा, श्रीराम सामंत, दर्शना फोंडेकर, दिप्ती फोंडकर, पुर्वा मोदी यांनी एस. एस. सी. परिक्षेत गुणवत्ता यादित येण्याचा बहमान मिळविला. याप्रशालेने अनेक डॉक्टर, इंजिनियर, वकील, यशस्वी उद्योजक, व्यावसायिक, शिक्षक, नाट्य व सिनेकलाकार, चित्रकार, आयकर अधिकारी, बॅंक अधिकारी, चार्टड अकाऊटंट आणि यशस्वी राजकारणी  दिले असून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये देश – परदेशात उच्च पदावर आहेत. मागील ६० वर्षांच्या काळात बापू भाई शिरोडकर, एम. डी. राजाध्यक्ष, एच. व्ही. मुद्गल, एस.एस.म्हसकर, पी.डी. पाटील, डी. आर. गोरूले, कृ. व्ही. माने, अविनाश रत्नाकर, एम. एम. माळी, डी.एस.शिंदे, वि.का. पोफळे आदिंनी प्रशालेचे मुख्याध्यापक म्हणून यशस्वी धुरा सांभाळली. शाळेला व संस्थेला सातत्याने प्रगतिपथावर नेण्यास आपले बहुमोल योगदान दिले. तसेच अनेक गुणी शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचा-यांनी या रोपट्याचे कल्पवृक्षात रुपांतर करण्याचे योगदान दिले. आज या कल्पवृक्षाच्या छायेखाली ८० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्ञानदानाचे आणि १६७५ विद्यार्थी ज्ञानार्जनाचे कार्य करित आहे.

संस्थेच्या स्थापन कालापासून आजपर्यंत अनेक मान्यवरांच्या भेटी संस्मरणीय ठरलेल्या आहेत. यामध्ये सुप्रसिध्द साहित्यिक पु.ल. देशपांडे यांची भेट स्मृतीपटलावर कोरली गेली आहे. त्याचप्रमाणे दत्ता बाळ, मुंबईचे उद्योगपती डी. चुनिलाल, गोवर्धनदास, कोकणचे सुपुत्र व कोल्हपुरचे दानशूर व्यावसायिक शा. कृ. पंतवालावकर, तात्यासाहेब मुसळे, श्रीपाद काळे, प्रसिध्द इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सुप्रसिध्द साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, डॉ. भालचंद्र मुणगेकर व अनेक नेत्यानी संस्थेस भेट देऊन ही मंडळी संस्थेच्या मार्गक्रमनात माईलस्टोन ठरली आहेत.

आजपर्यंत रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव अनुभवणारी आपली शाळा (संस्था) अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करित आहेत. या टप्प्यावरून मागे वळून पाहताना विकास ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या शाळेचा मनोभावे कारभार पाहणारी सर्व शिक्षण प्रेमी मंडळी शाळेला आणखी भव्यदिव्य स्वरूपात उभे करण्याचा संकल्प घेत आहेत. खरे तर ही नितांत प्रामाणिक व शुध्द धारणा आहे.

आपली शाळा अद्यावत असावी, डौलदार इमारत असावी, हवेशीर मोठे वर्ग असावेत, चांगली बैठक व्यवस्था असावी, समृध्द ग्रंथालय – वाचनालय असावे, सुसज्ज प्रयोगशाळा असावी अशी परिपुर्ण आणि आजच्या काळाला साजेशी आपली शाळा निर्माण करण्याचा प्रयत्न संस्था चालकांचा आहे. त्यांच्या या धडपडीला फोंडाघाट आणि दशक्रोशीतील सुजान नागरीक शिक्षण प्रेमी व्यक्ती, आणि संस्था आजी –  माजी विद्यार्थी यांनी साथ दिली पाहिजे. “ही आपली शाळा आहे” या भावनेतून नवनिर्माणाचे हे शिवधनुष्य पेलले पाहिजे.

संस्थेची यशस्वी गाथा लिहिताना शब्द अपुरे पडतात त्यामुळे संस्थेचे माजी सचिव व बालकवी वसंत आपटे यांच्या खालील काव्यपंक्ती या लेखाच्या समारोपास व सर्वांच्या भावविश्वाशी निगडीत आहेत.

माय मराठी बोली आमुची

सुंदर आपुला देश

तशीच अमुची प्रिय आम्हाला

संस्था रम्य विशेष…..